कार्तिकी यात्रेवर ‘कोरोना’चे सावट ! श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – २६ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रेवर कोरोनाचे सावट असले तरी, यंदाची श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.

पुणे पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. त्याच पार्श्वभूमीवर कार्तिकीची शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, निवडणूक आयुक्त यांनी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास परवानगी दिल्याने, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर पहाटे २.३० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येईल.

दरम्यान, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आषाढी यात्रेनंतर कार्तिकी यात्रासुद्धा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्याच अनुषंगाने पंढरपूर परिसरातील आठ गावांमध्ये २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २२ ते २६ नोव्हेंबर या काळात पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून शहरात येणारी एसटीची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शहर आणि परिसरातील सुमारे ३५० मठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्तिकी खिलार जनावरांचा बाजारही रद्द
कार्तिकी यात्रेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशसोबत अन्य राज्यांतून जातिवंत खिलार जनावरे मोठ्या संख्येने विक्रीसाठी येतात. बाजारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोनाचे सावट लक्षात घेऊन खिलार जनावरांचा बाजार भरणार नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.