पुणे जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला जेजुरीचा आढावा

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन –   दि. ८ मे रोजी जेजुरी येथे कोरोना पोझीटिव्ह रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जेजुरीला भेट घेवून येथील परिस्थितीचा आढावा घेतला. व उपाय योजनेबाबत महत्वाच्या सूचना दिल्या .

पुरंदर तालुका आत्ता पर्यंत कोरोनामुक्त होता. शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदींनी अतिशय कठोर मेहनत घेवून गेली दीड महिना तालुका सुरक्षित ठेवला होता. दि ८ मे रोजी जेजुरी देवसंस्थानच्या डायलिसीस सेंटर मधील एका आरोग्य कर्मचाऱ्याची खाजगी लॅब मध्ये कोव्हीड चाचणी पोझीटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ निर्माण झाली . प्रशासन,आरोग्य विभाग,पोलीस यंत्रणा सुसज्ज होवून या कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सिव्हील सर्जन डॉ अशोक नांदापूरकर यांनी दुपारी जेजुरीला भेट दिली. कोरोना बाधित व्यक्ती,तो राहत असलेला परिसर, डायलिसीस सेंटर,तसेच आतापर्यंत केलेली उपाययोजना योजना याबाबत आयुष प्रसाद यांनी माहिती घेतली. पुढील काळात कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत त्यांनी सूचना दिल्या.तसेच स्थानिक प्रशासन,पोलीस व आरोग्य खात्यास शासनाच्या वतीने सर्व प्रकारची मदत देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

तहसीलदार रुपाली सरनोबत,जेजुरी पालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम यांनी सद्यस्थिती विषयी व उपयायोजने बाबत माहिती दिली. यावेळी पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, भोर विभागाचे पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव,जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,तालुका आरोग्याधिकारी विवेक आबनावे,जेजुरी ग्रामीण रुग्नालायचे अधीक्षक डॉ प्रबंध भिसे,जेजुरी पालिकेचे नोडल अधिकारी बाळसाहेब बगाडे,शिक्षण विभागाचे सतीश कुदळे,सुरेश लांघी,उज्वला नाझीरकर आदी उपस्थित होते.