वीजबिल माफीचा वाद : राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मुंबईत मनसेची महत्वाची बैठक, राजकीय आरोप सुरूच

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन काळातील वाढीव बिलांमध्ये 50 टक्के सवलत देण्याच्या घोषणेवरून घुमजाव केल्याने राज्यात संतप्त प्रक्रिया उमटत आहेत. राज्यातील विरोधी पक्षांनीदेखील सरकारला चारही बाजूने घेरले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. दरम्यान, मनसेने यावर आपली भूमिका मांडली नसली तरी आज मुंबईत मनसेची तातडीची बैठक होत आहे. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आपली भूमिका मांडू शकतात.

मनसेने वाढीव वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट देखील घेतली होती. आता महाविकास आघाडी सरकारने वीजबिल माफीवरून घुमजाव केल्याने मनसेची या संदर्भात आज गुरुवारी मुंबईत बैठक होत आहे, यामध्ये पक्षाची भूमिका ठरवली जाणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात आलेली वाढीव वीज बिले माफ केली जाणार नाहीत, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे, असे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर सर्वसामान्य देखील राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, यामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापले असून विरोधक आणि सत्ताधारी यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षेनते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात म्हटले की, आधी घोषणा करता मग घूमजाव करत तोंड लपवता, ताकद असेल तर वीज बिल माफ करून दाखवा. उर्जा मंत्री चुकीची माहिती देत आहेत आता पैसा नसल्याचे कारण देत बिल माफी देणार नाहीत असे म्हणत आहेत. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. आधी वीज बिल माफीची घोषणा केली. आम्ही निर्णय घेतला आहे, असेही बोलले. पाच वर्षांची मिळून येणार नाहीत, अशी बिले तीन महिन्यांत लोकांना आली, तरीही ती दुरुस्त केली गेली नाहीत.

तर यावर उर्जामंत्री राऊत यांनी म्हटले आहे की, महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सर्वसाधारण कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजपच्या काळात महावितरणची एकूण थकबाकी 50 हजार कोटींच्या घरात गेली.

भाजपाच्या आरोपांना शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभु यांनी म्हटले की, वाढीव वीज बिलाबाबत नितीन राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, पण भाजप या मुद्द्यावरून लोकांना भडकविण्याचे काम करीत आहे. भाजपच्या काळात थकबाकी वाढल्याने महावितरणला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

दरम्यान, सरकारने घुमजाव केल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थकीत वीज बिले भरू नयेत असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यांनी म्हटले की, लोकांनी वीज बिल भरू नये. ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा.