… म्हणून सरकार 22-23 रूपये किलो दरानं कांदा विकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांद्याचे दर गगनाला  भिडल्यामुळे महिलांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. कांद्याच्या दरवाढीला मुख्य कारण म्हणजे अवकाळी पावसाचा फटका त्याला बसला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने कांद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला. सध्या बाजारात कांद्याचे दर 58 रुपये किलो आहे. मात्र लवकरच सरकारकडून कांदा 22 ते 23 रुपये किलोने विकला जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच केंद्राने आयात केलेला कांदा बंदरावर पडून असून तो सडू लागल्याने कांद्याची कमी दराने विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

14 हजार टन कांदा आयात
कांद्याचे वाढते भाव पाहून केंद्र सरकारने नोव्हेंबर 2019 मध्ये एमएमटीसीच्या माध्यमातून 1.2 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला होता. एमएमटीसीने विदेशातील बाजारातून 14 हजार टन कांदा आयात केला आहे. आयात केलेला कांदा महाराष्ट्राच्या बंदरावर पडून आहे. बाजारात नवा कांदा येण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या खरेदी किंमतीत घट होत आहे. याच परिस्थितीमध्ये अनेक राज्यांनी अधिक दरात आयात केलेला कांदा खरेदी करण्यास तयार नाही.

आयात कांद्याची चव वेगळी
आयात केलेल्या कांद्याची चव ही राज्यातील कांद्याच्या चवीपेक्षा वेगळी आहे. याच कारणामुळे आयत केलेल्या कांद्याला भाव मिळत नाही. तसेच कांद्याचे ठेके रद्द करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात बंदरावर कांद्याचा खप पडला आहे. नाफेड, मदर डेअरी आणि अन्य राज्यातील सरकार त्यांच्या बाजारात कांद्याची विक्री 22-23 रुपये किलोने करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.