विमान प्रवास करताय, जाणून घ्या क्वारंटाईनची नवीन नियमावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात अनेक भारतीय लोक अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यात येत आहे. मात्र, मायदेशी आल्यानंतर प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत होते. आता सरकारने या संदर्भातील धोरणांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे प्रवाशांचे आगमन आणि त्यानंतरची प्रक्रिया जलद होणार आहे. नुकताच सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयानुसार ज्या प्रवाशाची 96 तासात केलेली कोव्हिड चाचणी निगेटिव्ह असेल अशा प्रावाशाला क्वारंटाईनमधून सवलत मिळणार आहे. त्यामुळे कोव्हिड निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशांना आता विमानतळ किंवा त्यानजिक क्वारंटाईन रहावे लागणार नाही. याच धर्तीवर भारतातून परदेशी जाणाऱ्या प्रवाशांना देश सोडण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे. त्यांचे कोरोना चाचणी अहवाल त्यांच्यासोबत पाठवले जाणार आहेत. जेणेकरून तो दाखवून त्यांना विमानतळ सोडण्यास परवानगी मिळेल, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

पुरी यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांना तातडीने सर्व परवानगी मिळावी, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. दररोज भारतात आगमन करणाऱ्या प्रवाशांना विमानतळातून बाहेर पडण्यास किती कालावधी लागतो त्याचा आढावा घेतला जात आहे. त्यात आणखी काय काय सुधारणा करणे आवश्यक आहे त्या केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

क्वारंटाईन पॉलिसीनुसार यापूर्वी प्रवाशाला प्रवासानंतर क्वारंटाईन होणे बंधनकारक होते. त्यामुळे प्रवाशांचा अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च होत होता. या प्रक्रियेमध्ये मागील काही दिवसांपासून प्रवाशी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत असल्याचे दिसून येत आहे. याची माहिती मिळाल्यानंतर क्वारंटाईन नियमावली शिथिल करण्यात आली असल्याची माहिती पुरी यांनी दिली. अनेक प्रवाशांनी क्वारंटाईनमधून सवलत मिळावी यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती.

या सर्व प्रक्रियेत प्रवाशांचा खोळांबा होत होता. त्यामुळे ज्या प्रवाशांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यांना क्वारंटाईनमधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी शनिवार पासून सुरु झाली असल्याची माहिती पुरी यांनी दिली. तसेच कोरोना चाचणीचा अहवाल ऑनलाइन सादर करून प्रवाशांना क्वारंटाईनमधून सवलत मिळवता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.