मोदी सरकार चीनला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत, घेणार ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातवरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने चीनला एका मागून एक धक्के देत आहे. मुजोर चीनला वठवणीवर आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लडाख दौऱ्यावर गेले. त्यांनी जखमी सैनिकांची भेटही घेतली होती. आता केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहे. त्यामुळे चीनला आणखी एक मोठा दणका बसू शकतो.

भारतात गुंतवणूकीसाठी आलेल्या 50 चीनी कंपन्यांच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याची तयारी केंद्राने चालवली असून हा निर्णय झाला तर तो चीनला आणखी एक मोठा दणका असू शकतो. कोरोनाचं संकट आल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार भारताच्या शेजारच्या देशांना भारतात कुठेही गुंतवणूक करायची असल्यास त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं होतं.बड्या विदेशी कंपन्या भारतीय कंपन्यांची खरेदी करू नये हा त्यामागचा उद्देश होता. या नंतर 50 चीनी कंपन्यांनी गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. त्या सर्व प्रस्तावांचा फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याला मागे हटवण्यासाठी आपल्या सर्वात मजबूत राजनैतिक शस्त्राचा वापर केला आहे. केंद्राने सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांना पुढे ठेवले होते. रविवारी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुमारे दोन तास चर्चा केली होती. भारताच्या कठोर भूमिकेनंतर चीनकडे माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.