आता तरी सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी : अशोक चव्हाण

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-मराठा आरक्षणासाठी सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये असे वक्तव्य  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे. सरकारने विनाविलंब अहवालातील शिफारशी जनतेसमोर ठेवाव्यात असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात आपला अहवाल सादर केला असला तरी अद्याप त्यातील शिफारसी औपचारिकपणे स्पष्ट झालेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल प्रधान सचिवांना सादर केल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, “भाजप-शिवसेना सरकारने अगोदरच मराठा आरक्षणासंदर्भात प्रचंड दिरंगाई केली आहे, किमान आता तरी सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात पावले उचलावीत.  जर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारच्या दृष्टीकोनातून इतका महत्त्वपूर्ण होता तर तीन वर्षापूर्वीच आयोगाचे गठन का केले नाही? तसेच न्यायालयाने सातत्याने विचारणा केल्यानंतरही शपथपत्र दाखल करायला अठरा महिने वेळ का लागला? या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत.”

मराठा समाजाला 16टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातच घेतला गेला होता. त्याची पुन्हा अंमलबजावणी करण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असेल तर काँग्रेस पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच आपली भेट घेतली. सरकारने वेळकाढूपणा न करता तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी  केली. याशिवाय मराठा आरक्षण लागू करण्याबाबत सरकारने लवकर निर्णय घेतला असता तर मराठा समाजाला 58 मोर्चे काढावे लागले नसते. 40 जणांना आपला जीव गमवावा लागला नसता असेही ते म्हणाले.

‘मी नांदेड जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मात्र यासंदर्भात पक्षाचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, जी जबाबदारी पक्ष देईल ती आपण पार पाडू’ असेही अशोक चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आज टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, माजी मंत्री आ. नसीम खान, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, आ. बंटी पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. आनंदराव पाटील माजी मंत्री व पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील, पृथ्वीराज साठे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.