ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा : छत्रपती संभाजीराजे

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राला पराक्रमी इतिहासाचा मोठा वारसा असून त्याची साक्ष देणारी ऐतिहासिक स्थळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थळांचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे विचार युवराज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. ते प्रा. संतोष पिंगळे लिखित ‘सरंजामी मरहट्टे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, छत्रपतींच्या राज्याच्या विस्तारासाठी अनेक घटकांचे योगदान मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास देखील जतन झाला पाहिजे. याकरिता महाराष्ट्रातील गडकिल्ले, गढ्या व वाडे यांचे जतन करण्यासाठी शासनाने योगदान देणे गरजेचे आहे. गणिताचे प्राध्यापक संतोष पिंगळे इतिहासाचे संदर्भासहीत पुस्तक लिहितात, हे आजच्या सोहळ्याचे वेगळेपण असल्याचे यावेळी खा. संभाजीराजे यांनी मत व्यक्त केले.

पुणे येथील कोथरुडमधील हर्षल हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर होते. यावेळी सकाळचे संपादक श्रीराम पवार, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, लेखिका डॉ. सुवर्णलता जाधवराव व मरहट्टी संशोधन विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश महारनवर आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सकाळचे संपादक श्रीराम पवार, डॉ. सुवर्णलता जाधवराव, प्रा. संतोष पिंगळे, सुजाताराजे पांढरे, प्रशांत लवटे आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप माने यांनी केले. तर सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रणव पाटील यांनी केले. शेकडो इतिहासप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातून आलेल्या मध्ययुगीन सरंजामी घराण्याच्या वारसदारांचा खा. संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Visit : Policenama.com