नारायण राणेंनी पुन्हा एकदा सांगितलं ‘महाविकास’मध्ये एकमत नाही, म्हणाले – ‘या’ महिन्यापर्यंत सरकार कोसळेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत दिसत नसून, तीनही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत. त्यामुळे सरकार चालताना दिसत नाही, सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत हे सरकार टिकेल, असा पुनरुच्चार करत भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. तर यापूर्वी सुद्धा १५ दिवसांत सरकार पडेल असा दावा राणे यांनी केला होता.

एका वृत्तवाहिनीला बोलताना नारायण राणे म्हणाले, सध्या सरकार चालत नाही, प्रत्येक पक्षात वाद सुरु आहेत. महाविकास आघाडीत एकमत नाही. मग सरकार चालणार कसे? फारतर हे सरकार सप्टेंबर पर्यंत चालेल असा दावा त्यांनी केला. तसेच सुशांत सिंह व कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वादावरुन नारायण राणे शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना खूप कमी काम आहे, आम्ही मोकळे आहोत, कधी कर्नाटकात येताय, मी येतो असे म्हणत संजय राऊतांना मी नेता मानत नाही, मी जाईन त्यांनी यावे असा टोला संजय राऊतांना राणे यांनी लगावला आहे. तसेच सुशांत सिंह प्रकरणावरुन लोकांचे मन वळवण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत आहेत. पण सुशांतचा खून की आत्महत्या याचा तपास सुरु असल्याचं नारायण राणे यावेळी सांगितलं.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह प्रकरणात काही संबंध नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी पोलिसांना ते द्यावे, तसेच या प्रकरणात आदित्य यांचे नाव जोडून युवा नेत्याचे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न विरोधकांचा असल्याचा आरोप शिवसेनेने केला. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सरकार कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दात विरोधकांनी नाव न घेता शिवसेना व आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.