Lockdown जाहीर केल्यानंतर गावाला जाता येणार का ? मंत्री वडेट्टीवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज लॉकडाउनबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर लॉकडाउन लागल्यानंतर लोंकाना गावाला जाण्यास मुभा असेल का ? यासंदर्भात माहिती देताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिले आहे. लॉकडाउन लागण्यापूर्वी किमान २ दिवस वेळ दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ‘लोकांना किमान वेळ दिला जावा असं सर्वांचंच मत आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे योग्य निर्णय घेतील. महाराष्ट्रात एक आठवड्याचा लॉकडाउन पुरेसा नाही. तर किमान लॉकडाउन हा १४ दिवसांचा असावा असे सर्वांचे मत आहे. मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. तो दोन आठवड्यांचा असावा किंवा कमी असावा किंवा अधीक असावा यावर मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत.

तसेच, त्याआधी कामगारांना किंवा घरापासून दूर असलेल्यांना सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी वेळ दिला जाईल. लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाऊ देण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे, असते वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन नियमावलीची तयारी जवळपास झाली आहे. लॉकडाउन नेमका कसा असेल ? त्यात नेमके काय निर्बंध असतील ? काय सवलती असतील ? याबाबत मुख्यमंत्री आज किंवा उद्या घोषणा करतील, असेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.