मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत ग्वाही, म्हणाले – ‘मराठवाडा वॉटर ग्रीड ठाकरे सरकार बंद करणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली मराठवाडा वॉटर ग्रीड ही मराठवाड्यातील 11 धरणे जलवाहिन्यांनी जोडणारी महत्त्वाकांक्षी योजना सध्या बंद आहे. यावर सोमवारी (दि. 8) सभागृहात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना म्हणाले की, मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना अजिबात गुंडाळलेली नाही. ही योजना बंद करण्याचे पाप आमचे सरकार करणार नसल्याचे सांगितले. तसेच कोरोनामुळे या योजनेला खीळ बसली असल्याचे त्यांनी मान्य केले.

गेल्या दीड वर्षापासून मराठवाड्यातील ही योजना बंद असून ती गुंडाळली का, असा प्रश्न तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, उदयसिंग राजपूत यांनी उपस्थित केला. विधानसभेत मुटकुळे तसेच भाजपचे बबनराव लोणीकर, राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर मंत्री पाटील म्हणाले की, जायकवाडी धरणालगत असलेल्या पैठण, वैजापूर व गंगापूर या तालुक्यातील कामे पहिल्या टप्प्यात होणार असून ती लवकरच सुरू होतील. त्यानंतर बीड, लातूरसह टप्प्याटप्प्याने कामे केली जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी बैठक घेतली असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. गेल्यावर्षी या योजनेसाठी 200 कोटीची तरतूद होती. पण काहीच काम झाले नाही. याकडे लोणीकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर, कोरोनामुळे कामे रखडल्याचे पाटील यांनी मान्य केले. केंद्राच्या जलजीवन योजनेतून या प्रकल्पाला मदत मिळावी यासाठी 5500 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.