महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात ‘पिता-पुत्रा’सारखं नातं : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि.23) राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवनने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, शिवसेना खासदार आणि राज्यपाल याच्यात झालेली भेट ही ‘शिष्टाचार भेट’ असल्याचे म्हटले आहे.

राऊत यांनी कोश्यारी यांची अशावेळी भेट घेतली, ज्यावेळी बुधवारी राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने कोणती तयारी केली आहे याचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती आणि या बैठकिला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. याच आठवड्याच्या सुरुवातीला विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याची तक्रार केली होती.

दरम्यान, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये कोणताही संघर्ष नाही. त्यांचे नाते वडील आणि मुलासारखे आहे आणि ते तसेच राहील. दरम्यान संजय राऊत यांचा राज्यपालांना नमस्कार करतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटोवरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. धडकने लगा दिल, नजर झुक गई, कभी उन से जब ‘सामना’ हो गया, असे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून केलं आहे.