प्रकृती बिघडल्याच्या चर्चेला उधाण आल्यानंतर स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीच केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीवरून काही उलट-सुटल चर्चा सुरु होती. तसेच ते आयसोलेशनमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सगळ्या चर्चांबाबत आणि त्यांच्या कोरोना चाचणी अहवालाबाबत स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माहिती दिली आहे.

आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केलं आहे. आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्याचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. या संदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यापालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे.

राजभवनातील 100 जणांची चाचणी
राजभवनातील जवळपास 18 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त एएनआयनं दिलं आहे. राज्यपालांचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या राजभवनातील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं चाचणी करण्यात आली आहे.