प्रवासी मजुरांसाठी ‘देवदूत’ बनलेल्या सोनू सूदच्या कामानं प्रभावित झाले राज्यपाल कोश्यारी, म्हणाले…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना साथीच्या आजारामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना घरी पाठवण्यासाठी सोनू सूद यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वजण कौतुक करीत आहेत. या उदात्त कार्यामुळे हजारो प्रवासी कामगार लॉकडाऊन दरम्यान मुंबईहून सुखरुप त्यांच्या घरी पोहोचले आहेत. फिल्मस्टार सोनू सूद यांनी म्हटले आहे की जोपर्यंत प्रत्येक प्रवासी कामगार आपल्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत आपण आपली मोहीम सुरू ठेवू. तसेच सोनू सूद यांनी आता महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या ट्विटर हँडलवर सोनू सूद आणि भगतसिंग कोश्यारी यांचे फोटो शेअर केले गेले आहेत. ज्यात राज्यपाल कोश्यारी अभिनेता सोनू सूद यांना प्रशस्तिपत्र देताना दिसत आहेत. या संदेशामध्ये या फोटोंसह असे लिहिले आहे की, ‘प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली.’

सोनू सूद यांनी सोशल मीडियावर हेल्प लाईन नंबर वितरित केला आहे जेणेकरून बाहेर जाणारे लोक त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. त्यांनी ट्विट केले की, ‘माझ्या प्रिय कामगार बंधू आणि भगिनींनो जर आपण मुंबईत आहेत आणि आपल्या घरी जायचे असेल तर कृपया 18001213711 वर कॉल करा आणि सांगा की आपण किती लोक आहात, आपण आता कुठे आहात आणि कुठे जायचे आहे. मी आणि माझ्या टीमकडून होईल ती मदत आम्ही नक्की करू.