होय, ‘राज्यपाल नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून दिल्या जाणार्‍या 12 जणांच्या नावाची यादी फेटाळणार हे ठरलंय’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ जागांच्या शिफारशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फेटाळून लावतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजीमंत्री विनय कोरे यांना खासगीत बोलताना सांगितल्याचा गौप्सस्फोट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते कोल्हापुरात वार्ताहरांना बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्री यांचे निधन झाले होते. त्यांचे सांत्वन करण्यासाठी भय्यासाहेब माने, जिल्हा बँकेचे युवराज पाटील गेले होते. त्यानंतर काही मिनिटांतच चंद्रकांत पाटील यांचे आगमन झाले. विनय कोरे आणि चंद्रकांत पाटील यांनी सांत्वनापर चर्चा झाल्यानंतर त्या दिवशी विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार आहे, अशी बातमी प्रसारमाध्यमात आली. त्या बातमीवर चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोरे यांना म्हटले, की या शिफारशी भाजप नियुक्त राज्यपालांकडून फेटाळण्यात येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, असा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी वार्ताहरांना बोलताना केला.

दरम्यान, राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असलेल्या व्यक्तींची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात येते. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, म्हणून विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची तरतूद संविधानात आहे.

राज्यपाल नियुक्त १२ संभाव्य आमदारांची नावे –

१. शिवसेना : आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे, सचिन अहिर
२. राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आदिती नलावडे, आनंद शिंदे
३. काँग्रेस : सत्यजित तांबे, नसीम खान, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत अथवा राजू वाघमारे