पानसरे हत्या प्रकरणी देगवेकरला ९ दिवसांची पोलिस कोठडी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. अमित देगवेकर असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अमित देगवेकरवर शस्त्रे पुरवणे, बेळगाव येथे झालेल्या कटाच्या बैठकीस उपस्थित राहणे तसेच  बेळगाव परिसरात झालेले बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्या वेळी प्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी केला. संशयित देगवेकरचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी देगवेकरचा या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचा युक्तिवाद केला.

देगवेकर हा सिंधुदुर्गमधील आहे. त्याला बंगळूर मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले होते. आतापर्यंत पानसरे हत्या प्रकरणी ७ जणांना अटक झाली आहे. जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश, जेष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी डेगवेकर याला यापूर्वीच अटक केली आहे. पानसरे हत्येच्या कटात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे एसआयटीच्या चौकशीत निष्पन्न झाले होते.

सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी देगवेकर हा बेळगाव येथे झालेल्या फायरिंग प्रशिक्षणावेळी उपस्थित असल्याचा संशय न्यायालयात व्यक्त केला. त्यामुळे आरोपीचा तपास पोलिसांना करण्यासाठी १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली. आजवर कोल्हापूर एसआयटीने केलेला तपास हा कॉपी-पेस्ट असल्यामुळे आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात केली. दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अमित डेगवेकर याला २३ जानेवारीपर्यंत ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.