कॉ. पानसरे हत्याप्रकरण : अमोल काळेला २२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी 

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी आमोल काळेचा ताबा एसआयटीने कर्नाटक पोलिसांकडून घेतला आहे. गुरुवारी (ता. १५) त्याला जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी अमोल काळे याचा महाराष्ट्रातील विचारवंतांच्या हत्यांमध्येही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्येमधील काळेचा सहभाग तपासण्यासाठी एसआयटीने बुधवारी कर्नाटक पोलिसांकडून काळेचा ताबा घेतला होता. त्याला गुरुवारी जिल्हा कोर्टात हजर केले असता कोर्टाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दाभोलकर हत्येपूर्वी काळे कोल्हापुरात वास्तव्यास होता. त्याचबरोबर त्याने कोल्हापुरातच शस्त्र प्रशिक्षण घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे. या अनुषंगाने त्याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. काळेच्या चौकशीतून कॉम्रेड पानसरे हत्येबाबत महत्त्वाचा उलगडा होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

कॉम्रेड पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर २०फेब्रुवारी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपाचारादरम्यान पानसरे यांचे निधन झाले होते.