गोविंदा पथकांनो जरा इकडे लक्ष द्या …!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

देशभरात दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दरम्यान दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर त्यांना अपघाती विम्याचे संरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील याचिकांमध्ये हस्तक्षेप अर्ज करणाऱ्या दहीहंडी समन्वय समितीने सर्व गोविंदांना विमा संरक्षण देण्याची लेखी हमी दिली होती. याचा परिणाम यंदा प्रथमच झाल्याचे दिसून येत आहे. गोविंदांना विमा संरक्षण मिळण्यात आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत विमा कवच जवळपास दुपटीने वाढले आहे.

‘दहीहंडीत अपघातग्रस्त गोविंदांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सर्व गोविंदांना दहा लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच दिले जाईल’, अशी लेखी हमी दहीहंडी समन्वय समितीने उच्च न्यायालयातील सुनावणीत दिली होती. दहीहंडीवरील निर्बंध हटवताना न्या. भूषण गवई व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही बाबही नोंदीवर घेतली होती. याचबरोबर मुंबई, पुणे व अन्य भागांतील पोलिसांनीही गोविंदा पथकांना परवानगी देण्यापूर्वी गोविंदांचा विमा काढण्याची अट घातली आहे. परिणामी दहीहंडी उत्सव (३ सप्टेंबर) तोंडावर असताना गोविंदांचा अपघाती विमा काढण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, उरणपासून अगदी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-खेडपर्यंतच्या गोविंदा पथकांची रीघ लागली आहे. शुक्रवारपर्यंत ६४१ पथकांनी स्वत:हून किंवा आयोजक वा प्रायोजकांच्या मदतीने आपापल्या गोविंदांचा अपघाती विमा काढला आहे. त्यामुळे ३२ हजारहून अधिक गोविंदांना यंदा विम्याचे कवच लाभले आहे.

पुणे : हिंजवडीतून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केल्याची चर्चा
‘दरवर्षी जुन्या व मोठ्या गोविंदा पथकांकडून आपल्या गोविंदांचा अपघाती विमा काढला जातो. लहान पथकांकडून ही बाब तितकीशी गांभीर्याने घेतली जात नव्हती. मात्र, यंदा न्यायालयाचा आदेश आणि पोलिसांच्या अटींमुळे विमा सुरक्षा लाभलेल्या गोविंदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गतवर्षी एकूण ३८९ पथकांनी विमा काढला होता. ती संख्या आतापर्यंत सहाशेहून अधिक झाली असून आणखी वाढण्याची शक्यता आहे. गोविंदा पथकांची रीघ लागली असल्याने मुदत संपल्यानंतरही आज, शनिवारी सुटीच्या दिवशी विमा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’, अशी माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक सचिन खानविलकर यांनी एका वृत्तपत्राला दिली.

असे आहे विमा संरक्षण

‘गोविंदा अपघात विमा’ या योजनेअंतर्गत केवळ ७५ रुपयांत प्रत्येक गोविंदाला दहा लाख रुपयांचा अपघाती विमा उपलब्ध करण्यात आला आहे. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची भरपाई, दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास किंवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास त्या गोविंदाला दहा लाख रुपये, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख रुपये, रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास एक लाख रुपयांपर्यंत खर्च अशी सुविधा या योजनेत देण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eaa2a845-adbe-11e8-856e-b563e872ceb8′]