COVID-19 : ‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्यांपैकी निम्म्याहुन अधिक रूग्ण 60 वर्षापेक्षा कमी वयाचे, 43 % लोकांना यापुर्वी कोणताही आजार नव्हता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशभरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 18 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारकडून आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. 2 जुलै पर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अर्ध्याहून जास्त रुग्णांचे वय 60 वर्षांखालील आहे. या व्यतिरिक्त अशा 43 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे ज्यांना यापूर्वी इतर कोणताही आजार नव्हता. तर सरकारकडून असा दावा केला जात आहे की, कोरोनमुळे बहुतेक अश्या लोकांचा मृत्यू झाला आहे, जे आधीच एखाद्या आजाराने ग्रस्त आहेत.

आश्चर्यकारक आकडेवारी
कोरोनाच्या या आकडेवारीचे आकलन इंटरग्रेटेड डिसीज सर्विलेंस प्रोग्राम अंतर्गत करण्यात आले आहे. हे विभाग आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याअंतर्गत आतापर्यंत 17834 मृत्यूंचे आकलन करण्यात आले. दुसर्‍या आजाराचा आणि रुग्णांच्या वयानुसार हे मूल्यांकन केवळ 15,962 रूग्णांच्या मृत्यूवर केले गेले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही 3 राज्ये अन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूविषयी सातत्याने माहिती सामायिक करत नाहीत.

बदलतोय मृत्यूचा पॅटर्न
यापूर्वी 21 मे रोजी सरकारने हा डेटा दिला होता. त्यावेळी, देशभरात कोरोनामुळे 3435 लोक मरण पावले. त्यानंतर असे म्हटले गेले की, 73 टक्के कोरोना रुग्ण इतर आजारांमुळे मरण पावले. पण गेल्या दोन महिन्यांत गोष्टी बदलल्या आहेत. आता नव्या आकडेवारीनुसार अशा 43 टक्के रुग्णांचा मृत्यूही झाला आहे, ज्यांना इतर कोणताही आजार नव्हता. आकडेवारीनुसार 14 वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण 0.54 टक्के आहे. 15-29 वर्षांदरम्यान हे प्रमाण 2.64% आहे. तर 30-44 वर्षाच्या रूग्णांमध्ये हे मृत्यूचे प्रमाण 10.82% आहे. 45-59 वर्षे वयोगटातील लोकांमधील मृत्यूचे प्रमाण 32.79 टक्के आहे. या व्यतिरिक्त 60-74 वर्षे वयाच्या वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण 39.02% आहे. तर 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 12.88 टक्के आहे.