‘त्या’ घटनेनंतर CRPF च्या जवानांसाठी विमानसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे आता सीआरपीएफ जवानांनाही श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षादलाना यापूर्वी जम्मू ते श्रीनगर जो रस्त्याने प्रवास करावा लागत होता तो आता थांबणार आहे. या आदेशाची माहिती सुरक्षा दलांच्या प्रमुखांना देण्यात आली आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सुमारे ७ लाख ८० हजार जवानांना याचा लाभ होणार आहे.

निमलष्करी दलाच्या जवानांना यापुढं दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, श्रीनगर-जम्मू व जम्मू-श्रीनगर दरम्यान विमानानं प्रवास करता येणार आहे. कर्तव्यावर असताना तसंच, सुट्टीवर जाताना वा पुन्हा रुजू होताना ही सुविधा मिळेल. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल.

आत्तापर्यंत फक्त लष्करी जवानांसाठीच ही सेवा होती. CRPF च्या जवानांना बसने प्रवास करावा लागत होता. त्यांसाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था द्यावी लागत होती आणि जोखीमही प्रचंड होती. त्यातच पुलवामा घटनेनंतर या जवानांना विमानसेवा नसल्याबद्दल प्रचंड टीका झाली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे.