‘पाकिस्तान नॅशनल डे’ निमित्त मोदींच्या शुभेच्छा

विरोधकांची टीका तर भाजपचे औपचारिकता असल्याचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनावर भारताने बहिष्कार घातलेला असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दिनानिमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा संदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान नॅशनल डे निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात होणाऱ्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर भारताने बहिष्कार घातला. पण त्याचवेळी मोदींनी पाकिस्तानी जनतेला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. इम्रान खानने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या शुभेच्छा संदेशांबाबत इम्रान खान याने ट्विट केले आहे. ” मी नरेंद्र मोदी पाकिस्तान नॅशनल डे निमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरणात उपखंडातील जनतेने लोकशाही, शांतता, विकास आणि समृद्धतेसाठी एकत्र काम करण्याची गरज आहे” अशा शब्दात मोदींनी शुभेच्छा दिल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये इम्नान खान यांनी नरेंद्र मोदींच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. दोन्ही देशांमधील प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्याची वेळ आली असल्याचे मत इम्रान यांनी मांडले आहे.

विरोधकांची टीका तर भाजपची औपचारिकता असल्याचे स्पष्टीकरण-

दरम्यान यावरुन काँग्रेसने मोदींवर टीका करणे सुरु केले आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. खुर्शीद यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “हम उफ़्फ़ भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता”

तर भारताच्या पंतप्रधानांनी इतर देशांच्या राष्ट्रीय दिवसनिमित्त किंवा राष्ट्रीय सणानिमित्त शुभेच्छा देणे हा औपचारिकतेचा भाग आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. तर भाजपनेदेखील ही केवळ औपचारिकता असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.