महाराष्ट्र सरकारनं 90 % ‘निर्भया’ फंडाचा वापरच केला नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसाठी देण्यात आलेल्या निर्भया निधीचा महाराष्ट्रात वापरच केला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, राज्यांना देण्यात आलेल्या या निधीपैकी 90 टक्के निधीचा वापरच झालेला नसल्याचे समोर आले आहे. दिल्लीत डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर या निधीची सुरुवात करण्यात आली होती.
देशात विविध राज्यांत तरुणींवर बलात्कार, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत असताना या निधीचा वापर महिलांच्या सुरक्षेसाठी न होणे हे धक्कादायक आहे. हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवरील बलात्कार, उत्तर प्रदेशातील उन्नाव पीडित तरुणीला जाळून टाकण्याच्या घटना समोर आल्यानंतर निर्भया निधीचा वापर राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेकरीता करत नसल्याचे स्पष्ट झाले.

सरकारने प्रसिद्ध केलेल्या अहवालात उत्तराखंड आणि मिझोराम या छोट्या राज्यांनी एकूण निधीपैकी 50 टक्के निधी वापरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर छत्तीसगड मध्ये 43 टक्के, नागालँड 39 टक्के आणि हरियानात 32 टक्के निधीचा वापर करण्यात आला आहे. देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी केवळ चार राज्यांनी सर्वाधिक निधी वापरला आहे. तर 15 टक्क्यांपेक्षा अधिक निधी 18 राज्यांनी वापरला आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने 29 नोव्हेंबर रोजी याबाबत लोकसभेत माहिती दिली.

निधी खर्च करण्यात महाराष्ट्र शेवटच्या स्थानावर
महाराष्ट्र निधी वापरण्याच्या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 2017 मध्ये दिलेल्या अहवालात राज्य महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. तरी देखील महाराष्ट्र सरकारने या निधीचा वापर केलेला दिसून येत नाही. कर्नाटक, ओडिशा आणि तेलंगणामध्ये केवळ 6 टक्के निधी वापरण्यात आला. तर उत्तर प्रदेशात 21 टक्के निधी वापरला आहे. कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशनने केलेल्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की एकूण निधीपैकी राज्यांनी केवळ 11 टक्के खर्च केला.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like