कोव्हॅक्सीन, कोविशील्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर किती पॉझिटिव्ह झाले? आरोग्य मंत्रालयाने सांगितले

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   कोरोना व्हायरस संसर्गाच्या सध्याच्या स्थितीबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हटले की, देशातील 146 जिल्हे सरकारसाठी चिंतेचा विषय आहेत. या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्केपेक्षा जास्त आहे. मंत्रालयाने म्हटले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप देशातील सर्व राज्यात आहे. सध्या ज्या अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, त्या मागील वर्षाच्या अ‍ॅक्टिव्ह केसच्या तुलनेत दुप्पट आहेत.

740 जिल्ह्यांपैकी 146 जिल्ह्यांमध्ये 15 टक्केपेक्षा जास्त पॉझिटिव्ही रेट आहे आणि हाच चिंतेचा विषय आहे. याशिवाय 274 जिल्ह्यांपैकी 5 ते 15 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे, 308 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्केपेक्षा कमी आहे. पीटीआयनुसार, केंद्र सरकारने म्हटले आहे की, कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेतल्यानंतर 0.04 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर कोविशील्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांची संख्या 0.03 टक्के आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ़, केरळ सर्वात जास्त प्रभावित राज्य आहेत. विशेष फोकस या राज्यांवर आहे आणि राज्यांसोबत मिळून केंद्र सरकार काम करत आहे. राजेश भूषण यांनी म्हटले की, देशात 21 लाख 57 हजार अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, हे दुसर्‍या लाटेदरम्यान देशाच्या सर्व राज्यात आहे. कोरोना संसर्गाने मृत्यू 1.17 टक्के आहेत, रिकव्हरी रेट 85 टक्के आहे.

आरोग्य सचिवांनी म्हटले की, महाराष्ट्रात 6 लाख 85 हजार, युपीत 2 लाख 23 हजार केस आहेत, ही राज्य अशी आहेत, ज्यांच्यासोबत मिळून केंद्र हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सीजन उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. युपीत सरासरी प्रकरणे वेगाने वाढत आहेत. मृत्यूचा सरासरी दर सुद्ध वाढत आहे.