भोरमध्ये वीज पडून ठार झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांना शासनाने भरपाई द्यावी – शेतकरी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे

पुणे : वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस सुरू असताना वीज कोसळून कातकरी वस्तीमधील दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर एक जखमी झाली आहे. ही घटना चेलाडी फाटा (नसरापूर, ता. भोर) येथे घडली. या कुटुंबाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाच्या वतीने 15 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी नागरिक शेतकरी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी केली आहे.

सीमा अरुण हिलम (वय 11), अनिता सिकंदर मोरे (वय 9) या दोघींचा मृत्यू झाला असून, चांदणी प्रकाश जाधव (वय 9) ही जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मोरे म्हणाले की, रविवारी (दि. 2 मे) दुपारी तीनच्या सुमारास सोसायट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस सुरू झाला. नसरापूर-चेलाडी फाटा येथे कातकरी वस्तीमधील दगडाजवळ तीन मुली खेळत होत्या. यावेळी विजांचा मोठा आवाज झाला आणि वीज कोसळली. त्यामध्ये सीमा हिलम व अनिता मोरे या दोघी जागीच ठार झाल्या तर चांदणी प्रकाश जाधव ही मुलगी किरकोळ जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. कातकरी वस्तीवरील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने १५ लाख मदत द्यावी, असे निवेदन दिले आहे. मोरे 2014 पासून या कुटुंबीयांना शासनाची जागा मिळावी, पिवळी शिधापत्रिका मिळावी, मुलांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, त्यांना व्यवसाय करण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी शासनाकडे करीत आहे. 2014 साली उच्च न्यायालयात पत्र दिले होते, त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे सांगितले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी भोरचे तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अहवाल दिला आहे. वनविभागाची जागा जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन कातकरी समाजातील नागरिकांना जागा देऊ असे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले.