‘इंडियन व्हेरियंट’ शब्दाच्या वापराबद्दल केंद्र सरकारची कडक भुमिका, सोशल मिडीया कंपन्यांना दिले कंटेंट हटविण्याचे निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयानक अशी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या लाटेतील व्हायरसचा उल्लेख ‘इंडियन व्हेरिएंट’ म्हणून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने कोरोनाच्या B.1.617 या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटविषयी 11 मे रोजी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी याचा उल्लेख ‘इंडियन व्हेरिएंट’ असा करायला सुरुवात केली होती. मात्र, WHO ने निवेदनात B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या चुकीच्या माहितीमुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे आता माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियंट असलेला मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.


B.1.617 व्हेरिएंट 44 देशांत
WHO च्या माहितीनुसार, B.1.617 व्हेरिएंटचा प्रसार जगातील 44 देशांमध्ये आढळून आला आहे. हा व्हायरस जास्त वेगाने संसर्ग पसवतो. त्यामुळेच भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे या व्हायरसचा प्रभाव कमी होतो, असेही WHO ने स्पष्ट केले होते.

कंटेट हटवणे सोपे नाही
सोशल मीडिया कंपनीशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा अनेक पोस्ट्स आहेत. ज्यामध्ये इंडियन व्हेरियंट शब्दाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे आता हा शब्द सोशल मीडियावरून काढून टाकणे सोपे नाही.