सरकार ‘या’ कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना देऊ शकतं कायमचं Work From Home; महिना अखेर होईल निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   गेल्या वर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यादरम्यान बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work From Home चा पर्याय दिला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना Work From Home देण्याची तयारी अनेक कंपन्यांनी केली आहे. यानुसार, आता स्पेशल इकोनॉमिक झोन (SEZ) मध्ये काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच पर्मनंट Work From Home ची सुविधा दिली जाणार आहे.

भारतात आयटी उद्योग व्यवसाय 191 अरब डॉलरवर गेला आहे. आयटी उद्योग संस्था नेसकॉमने सरकारकडे परवानगी मागितली आहे, की ‘सेझ’मध्ये काम करणाऱ्या आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना पर्मनंट Work From Home ची सुविधा दिली जावी, याबाबतची माहिती एका इंग्रजी दैनिकात देण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रायलाकडून या प्रस्तावावर विचार केला जात आहे. याबाबतचा निर्णय या महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना अनेकांना करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना Work From Home ची सुविधा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत यावर ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भारतातून आयटी सर्व्हिस एक्सपोर्टमध्ये सेझची भागीदारी सुमारे 60 टक्के आहे.

गृह मंत्रालयात 50 टक्के कर्मचारी

दिल्लीत कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने जास्तीत जास्त लोकांना Work From Home करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, अंडर सेक्रेटरी आणि त्यांच्या कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. तर कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक केली आहे.