महापालिकेचे जलतरण तलाव व क्रीडा संकुलांचे ‘जीपीएस टॅगींग’ होणार !

कराराचे उल्लंघन करणार्‍या संचालकांवर होणार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेने बांधलेले जलतरण तलाव आणि क्रीडा संकुले मालमत्ता विभागाकडून क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात अली आहे. क्रीडा विभाग हे तलाव आणि क्रीडा संकुलांचे ‘जीपीएस टॅगींग’ करणार असून पं.जवाहरलाल नेहरू स्टेडीयम आणि सणस स्पोर्टस् ग्राउंडच्या उपलब्धतेबाबत आणि बुकींगसाठी ऑनलाईन सुविधाही लवकरच सुरू करणार असल्याची माहिती क्रीडा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांसाठी शहरात विविध ठिकाणी जलतरण तलाव तसेच क्रीडापटूंसाठी व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, कुस्ती मैदान, बॉक्सींग रिंग, शुटींग रेंज बांधण्यात आली असून मैदानेही विकसित केली आहेत. जलतरण तलाव असो अथवा क्रीडा संकुले भाड्याने देण्याचे अधिकार आतापर्यंत मालमत्ता विभागाकडे होते. परंतू एप्रिलमध्ये हे सर्व अधिकार क्रीडा विभागाकडे सोपविण्यात आले आहेत. परंतू मागील तीन आठवड्यांमध्ये केवळ ५१ जलतरण तलाव आणि क्रीडा संकुलांचा कागदोपत्री ताबाच क्रीडा विभागाकडे देण्यात आला आहे. त्यांचीच यादी क्रीडा विभागाकडे दिलेली आहे. मात्र महापालिकेने शहरात गेल्या काही वर्षात १०० हून अधिक व्यायामशाळा, मैदाने, स्केटींग रिंग, शुटींग रेज अशी विविध संकुले उभारली आहेत. वरिल ५१ जलतरण तलाव व क्रीडा संकुल वगळता उर्वरीत सर्वच संकुले , जलतरण तलाव आणि मैदाने आजही पडून आहेत. मुलांना खेळाची आवड लागावी यासाठी उभारलेली ही संकुले व मैदाने ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत बंद असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही त्याचा नागरिकांना लाभ मिळत नसल्याने ती उभारण्याचा अट्टाहास केला जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

यासंदर्भात क्रीडा विभागाच्या प्रमुख महापालिकेच्या उपायुक्त डॉ. वनश्री लाभशेटवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्या म्हणाल्या मालमत्ता विभागाकडून नुकतेच जलतरण तलाव आणि क्रीडा संकुलांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची कागदपत्र आमच्या विभागाकडे आली असून सर्व जलतरण तलाव आणि क्रीडा संकुलांच्या सद्यस्थितीचे सर्वेक्षण करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानंतर देखभाल दुरूस्ती व ती चालविण्यास देण्याबद्दलची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. क्रीडा विभागाच्या सर्व मिळकतींचे जीपीएस टॅगींग करण्यात येणार आहे.

चालविण्यासाठी देण्यात आलेले जलतरण तलाव व क्रीडा संकुलांमध्ये करारानुसार अंमलबजावणी होते की नाही, याचे सतत ऑडीट करण्यात येणार असून जे कराराचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. क्रीडा संकुलांची उपलब्धता प्रामुख्याने नेहरू स्टेडीयम आणि सणस स्पोर्टस् कॉम्प्लॅक्स उपलब्धतेबाबतची माहिती पालिकेच्या वेबसाईटवर देण्यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील टप्प्यात ऑनलाईन बुकींगची यंत्रणाही सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.