ग्रामंपचायत निवडणूक : सर्वात आधी शिवसेनेनं खाते उघडले, ग्रामपंचायतीवर फडकावला भगवा !

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्याने गावोगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण, निवडणुकीचा निकालालागण्याआधीच शिवसेनेने खाते उघडले आहे. धुळे जिल्ह्यातील वडदे ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून शिवसेनेने भगवा फडकावला आहे.

राज्यात 14 हजार 232 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी मागणी पुढे येत आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वडदे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. वडदे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वडदे ग्रामपंचायतीवर बिनविरोध भगवा फडकावला आहे. परंतु, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अजूनही अर्ज भरण्याची छाननी सुरू आहे. मात्र, शिवसेनेन ही निवडणूक बिनविरोध झाल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायत बिनविरोध करून दाखवली आहे. सिमा देवेसिंग भिल, कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनिल चित्ते, माधुरी किशोर कोळी, राजेंद्र बन्सिलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रविण किसन चित्ते यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड करुन शिवसेनेचा भगवा फडकवून गेल्या 45 वर्षाची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे.