एक मत लाख मोलाचं ! नातवाला विजयी करून, आजीने घेतला जगाचा निरोप

कोळवण (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – एका 113 वर्षाच्या आजीने मतदानाच्या दिवशी (दि. 15) आपल्या नातवाला मतदान रुपी आर्शिर्वाद दिला अन् त्या दिवशीच रात्री त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे आजीचे एक मत नातवाच्या विजयासाठी निर्णायक आणि अविस्मरणीय असे ठरले आहे. कारण नातवाचा निवडणुकीत केवळ एका मताने विजय झाला आहे. यामुळे नातवाच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू आहे. मुळशी तालुक्यातील वाळेण गावात हा प्रकार घडला आहे.

सरुबाई शंकर साठे (वय 113) असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे. तर आजीच्या आशिर्वादाने अन् केवळ एका मताने विजयी झालेल्या उमेदवाराचे नाव विजय साठे असे आहे. वाळेण (ता. मुळशी) ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड 1 मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. त्यांना 127 तर विरोधी उमेदवार संजय चिंधु साठे यांना 126 तर यशवंत किसन ढमाले 13 मते पडली. विजय साठे यांना मिळालेले मोलाचे एक मत अविस्मरणीय असेच आहे. मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) सकाळी दहा वाजता मत मोजणीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. एकूण 14 टेबल वर मोजणी करताना 8 फेऱ्या ठेवल्या होत्या.