आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीसह संपूर्ण पॅनलचा पराभव

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल 25 वर्षांपासून पाटोदा गावात आदर्श सरपंच म्हणून गावगाडा हाकणारे आणि ज्या गावाच नाव आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यभरातच नव्हे तर देशभरात पोहचवले त्या भास्करराव पेरे -पाटील यांच्या संपूर्ण पॅनलला मात्र यंदा ग्रामपंचायत निवडणूकीत गावकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. खुद्द पेरे पाटील यांची कन्या अनुराधा पेरे- पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. पेरे- पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा गावाने मोडीत काढली. पेरे- पाटील यांनी देखील यंदा गावातील तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यंदा निवडणुकीत पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. अनुराधा पाटील यांना 183 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला 208 मते मिळाल्याने त्यांचा विजय झाला. पाटोदा ग्रामपंचायतील 8 सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित 3 जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्यातील एका जागेवर अनुराधा पाटील रिंगणात होत्या.

ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे आमिष दाखवून कोणी बिनविरोध करू पाहत असेल, तर निवडणूक व्हायला हवी. गावाच्या भल्यासाठी झटू पाहत असलेल्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन भास्करराव पेरे-पाटील यांनी लोकांना केले होते. ग्रामपंचायतीला निधी खूप येतो, पैशाची कमतरता नसते, परंतु नियोजन करून तो निधी खर्च केला पाहिजे असे त्यांनी सांगितले होते. मुलीने निवडणुकीत अर्ज केला आहे, परंतु तिला स्वीकाराव की नाकाराव हा सर्वस्वी निर्णय गावकऱ्यांचा असल्याचे पेरे- पाटील म्हणाले होते.