ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आजी, माजी सैनिकांना मिळणार ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील आजी, माजी सैनिकाना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत मंगळवारी (दि.18) निर्गमित करण्यात आले आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, सेवा पदकधारक यांना तसेच अशा पदकधारकांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे. आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातील सर्व आजी-माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजी-माजी सैनिकांनी केलेली देशाची सेवा विचारत घेता सर्व सैनिकांना भावनिक दिलासा व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतल्याचे, त्यांनी सांगितले. अशा करमाफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे, मुश्रीफ यांनी सांगितले. राज्याचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी यासंदर्भात मागणी करत पाठपुरावा केला होता.