लग्न समारंभातील गर्दीवर प्रशासनाचा ‘डोळा’; जास्त गर्दी झाल्यास तलाठी व ग्रामसेवकांवर कारवाई

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. परिणामी रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्न समारंभातही मर्यादित उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गडचिरोलीत लग्न समारंभामध्ये निश्चित संख्येपेक्षा जास्त लोक आढळल्यास वधू-वराच्या कुटुंबियांसह संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवकांवरही कारवाई होणार आहे.

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. गर्दीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत 185 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात लग्न समारंभांमध्ये गर्दीचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता लग्न समारंभासाठी निश्चित संख्येपेक्षा अधिक लोक आढळल्यास वधू-वराच्या कुटुंबियांबरोबरच संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवकांवरही कारवाई होणार आहे, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जारी केले आहेत.

कोरोना नियमावलीनुसार, सध्या लग्न समारंभामध्ये कीमान 25 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. पण त्यापेक्षा जास्त उपस्थिती असल्यास संबंधित वर-वधू, त्यांचे आई-वडील, मंगल कार्यालय/लॉन्स/सभागृह मालक, कॅटरर्स यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.