40000 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

चांदूर रेल्वे/अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – पथदिव्यांच्या कामाचे एम.बी.बूक जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी आणि त्या कामाचा धनादेश देण्यासाठी 40 हजार रुपयाची मागणी करून स्विकारताना चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथील ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले. प्रमोद नारायण चारथळ (वय-50 रा. विष्णूनगर, नवसारी, अमरावती) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई आज (बुधवार) चांदूर रेल्वे तहसील कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली.

पळसखेड ग्रामपंचायत येथे एल.ई.डी. पथदिव्यांच्या कामांचे एम.बी. बूक जिल्हा परिषदेकडे पाठविणे व त्या कामाचा धनादेश सोपविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी प्रमोद चारथळ याने तक्रारदारास लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने 25 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 7 ऑक्टोबर रोजी पडताळणी केली असता चारथळ याने एक लाख रुपयाची मागणी केली होती. तडजोडीत 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज (दि.18) लाचलुचपत विभागाने तक्रारीच्या आधारे चांदूर रेल्वे तहसील कार्यालयात सापळा रचला. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास 40 हजार रुपयाची लाच घेताना चारथळ याला रंगेहाथ पकडले. प्रमोद चारथळ याच्यावर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक गजानन पडघन, पोलीस हवालदार चंद्रशेखर दहीकर, सुनील वऱ्हाडे, युवराज राठोड, पोलीस शिपाई अभय वाघ, महेंद्र साखरे, चालक चंद्रकांत जनबंधू यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/