ग्रामसेवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई (बीड ) : पोलीसनामा ऑनलाईन – धारुर तालुक्यातील देवठाणा-जैतापूर-खामगाव ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक राजाभाऊ बन्सी जोगदंड (वय-४२ रा. येवता. ता. केज) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) सकाळी अंबाजोगाई लगतच्या बुट्टेनाथ परिसात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जोगदंड हे सध्या अंबाजोगाई शहरालगत पोखरी रोडवर वास्तव्यास आहेत. आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात मिटिंगला जाण्यासाठी ते घरातून बाहेर पडले होते. मात्र, वाटेतच त्यांनी बुट्टेनाथ परिसरातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तात्काळ अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, जोगदंड यांनी कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, मागील काही महिन्यापासून ते आर्थिक अडचणी आणि कामाचा तणाव यामुळे त्रस्त होते अशी त्यांच्या मित्रपरिवारात चर्चा आहे. राजाभाऊ जोगदंड यांचं पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.