लाच घेताना महिला ग्रामसेविका अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अंगणवाडी संरक्षक भिंतीच्या कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून १५ हजार रुपयेची लाच स्वीकारताना मंगळवेढा पंचायत समिती कार्यालय बालाजीनगरच्या ग्रामसेविका अर्चना लक्ष्मण केंदुळे (३६, रा.गुंगे गल्ली, ता.मंगळवेढा) या महिला ग्रामसेविकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे केंदुळे यांच्यावरील ही दुसरी कारवाई आहे. मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील अंगणवाडीच्या भिंतीच्या कामाचे बिल काढण्यासाठी केंदुळे यांनी ही लाच घेतली.

तक्रारदार यांनी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत बालाजीनगर येथील अंगणवाडीच्या संरक्षक भिंतीचे काम केले आहे. या कामाच्या ९७ हजार रुपये बिलाची रक्कम देण्यासाठी ग्रामसेविका अर्चना केंदुळे यांनी तक्रारदाराला गेल्या महिनाभरापासून बिल अडवून ठेवीत ३० हजारांची लाच मागितली होती. परंतु तडजोड होऊन १५ हजार रुपये देण्याचे ठेकेदाराने मान्य केले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन सापळा लावला होता. पंचायत समिती कार्यालयात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची रक्कम घेण्यास कार्यालयात कामानिमित्त उभारलेले मुढवीचे सरपंच तानाजी मनोहर रोकडे यांना सांगितल्याने रोकडे यांच्यामार्फत रक्कम स्वीकारत असताना केंदुळे हिला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर केंदुळे हिची या पथकाने सुमारे तासभर चौकशी केली व मंगळवेढा पोलीस ठाण्यात केंदुले विरोधात गुन्हा दाखल केला.

विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी म्हणजे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी मल्लेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बिगरशेती करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ याच बार्इंना पकडण्यात आले होते.  त्या कारवाईनंतर गेल्या वर्षी केंदुळे हिच्याकडे बालाजीनगरचा पदभार दिला होता. परंतु मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वीच कारवाईसाठी ग्रामपंचायतीला कुलूप लावले होते. एकाच महिला ग्रामसेविकेवर दोनदा लाचलुचपतच्या कारवाईमुळे पंचायत समितीच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे.