Pune News : दुर्देवी ! 60 वर्षाच्या आजोबांनी नातीला वाचवण्यासाठी घेतली धाव, डिंभे कालव्यात बुडून आजोब-नातीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात नातीला वाचवता आजोबाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील चास जवळील शेगरमळा मंगळवारी दुपारी येथे घडली. अन्विता प्रल्हाद शिंदे (वय-८), सदाशिव विष्णू शेगर (वय-६०) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची नोंद घोडेगाव पोलीसचे ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी शेगरमळा येथे अन्विता डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात पडली. याबाबत कळताच तिला पाण्यातून काढण्यासाठी कॅनॉलच्या जवळ शेतात काम करणारे अन्विताचे आजोबा सदाशिव शेगर यांनी कॅनॉलच्या पाण्यात उडी मारली. परंतु तेही पाण्यात बुडाले. या दोघांना पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी गावातील व आजुबाजूचे शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. दोघांनाही कॅनॉलमधील पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे आणण्यात आले. मात्र आजोबा आणि नातीला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबतची माहिती हरीदास शेगर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास पोलीस हवालदार महेश झनकर करत आहे.