पार्थ पवारांचे ठरले, पण रोहित पवारांचे काय ? ; शरद पवारांनी केलं स्पष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी तरुण पिढीली संधी देण्यासाठी मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मावळमधून पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढवतील, हे पवार यांनी स्पष्ट केले. त्यावर आता पार्थ पवार यांची राजकारणातील एन्ट्री फिक्स झाली आहे. मात्र रोहित पवार यांचे काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या घोषणे नंतर पत्रकारांनी रोहित पवार यांच्या उमेदवारी यांच्या उमेदवारी विषयी विचारलं. त्यावर लोकसभेसाठी रोहितचा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट केले आहे. माझ्या कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना वाटले की तिसरा सदस्य आपल्या कुटूबांतून नको. त्यामुळे मीच स्वत:हून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, आहे असं त्यांनी सांगितलं.

तसंच रोहित पवार विधानसभेला उभे राहतील का, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर विधानसभेला अजून वेळ आहे, त्यामुळे ते तेव्हा पाहुया, असं म्हणत पवार यांनी उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे सध्या रोहित पवार निवडणुकांच्या मैदानात नसले, तरी विधानसभेच्या रिंगणात उतरु शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. त्यावर अखेर पूर्णविराम लागला आहे. खुद्द शरद पवार यांनी पार्थ यांची मावळ मधील उमेदवारी फिक्स केली आहे.