15 मेपासून ‘त्याच’ छावणी चालकांना अनुदान

जिल्हाधिकाऱ्यांचे चारा छावणी चालकांना पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांची १५ मेपासून संगणक प्रणालीद्वारे दैनंदिन नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच संबंधित छावणीचालकांना अनुदानाची रक्कम देण्यात येईल. सर्व चारा छावणी चालकांनी जनावरांच्या दैनंदिन नोंदणीसाठी संगणक प्रणालीचा वापर करावा,’ असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. तसे पत्रही संबंधितांना पाठविण्यात आले आहे.

चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम (Cattle Camp Management System) हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. चारा छावणी चालकांना हे अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. त्या आधारेच छावणीतील जनावरांच्या दैनंदिन नोंदी कराव्या लागतील. मात्र, अशा पद्धतीने जनावरांच्या नोंदी करण्यास चारा छावणीचालकांचा विरोध सुरू झाला आहे.

ऑनलाइन नोंदणी करण्याची सक्ती करण्यात येत असेल तर १५ मे पासून चारा छावण्या बंद करण्याचा इशाराही काही चारा छावणीचालकांनी दिला आहे. त्यातच १५ मेपासून छावणीतील जनावरांची दैनंदिन नोंद ऑनलाइन पद्धतीनेच करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यापुढे ऑफलाइन पशुधनाची नोंदणी व पशुधनाची दैनंदिन नोंद घेतली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. १५ मे पासून संगणक प्रणालीद्वारे नोंद झालेल्याच पशुधनाची नियमाप्रमाणे देयके अर्थात अनुदान देण्यात येईल. ज्या जनावरांची नोंद ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेली नसेल, त्या जनावरांचे अनुदान चारा छावणी चालकांना देण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक चारा छावण्या चालकांचे धाबे दणाणले आहेत.