Great Job ! पुणे पोलिसांचे अथक परिश्रम अन् प्रयत्नांमुळं विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची संख्या घटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू आणि त्यास बळी बळी पडलेल्या लोकांची संख्या देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्राला जोरदार धडक दिली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात दिवसाला 50,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. मात्र, रुग्णांची संख्या थोडी फार कमी होताना दिसत आहे. यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. कोरोना इन्फेक्शनच्या वाढीस ब्रेक लागला असला तरी, रुग्णांच्या मृत्यूमुळे ही चिंता आणखीनच वाढली आहे. या भीषण परिस्थितीच्या चिंतेत ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली, तरीही लोक कर्फ्यूमध्ये प्रवास करताना आढळले. पण अचानक पुणे शहरातील बहुतेक रस्त्यांवर रविवारी संपूर्ण शांतता दिसून आली. आणि आठवड्याचा पहिला दिवस, म्हणजेच सोमवार असून देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या आज नाहीशी झालेली दिसत आहे. ज्या मागचे श्रेय जाते पुणे पोलिसांना.

पोलीसनामा ऑनलाइनच्या प्रतिनिधीशी बोलताना सहा. पोलीस निरीक्षक जी. डी. घावटे म्हणाले, ” लोक अनावश्यक गोष्टीसाठी रस्त्यावर फिरतात. आमचा कर्फ्यू असूनही ते गाड्यांवरून प्रवास करताना दिसून येतात. डबा किंवा जेवण पुरवणारे, वैद्यकीय कर्मचारी, हॉस्पिटल मध्ये असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघलेले आणि इतर पास किंवा परवानगी असणाऱ्या लोकांना आम्ही जाऊ देतो पण साध्या दुग्धजन्य पदार्थांवर फक्त दोन-3 रुपये वाचवण्यासाठी बरेच लोक मास्कशिवाय 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास करताना आम्हाला दिसतात. हे एक प्रकारे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणे आहे. आम्ही येथे रस्त्यावर आहोत जेणेकरुन ते या कोरोनाच्या विषाणू पासून सुरक्षित राहू शकतील, परंतु ते स्वतःच ठीक-ठिकाणी प्रवास करून आपल्या व आपल्या परिवाराला असुरक्षित करत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “2020 मध्ये लादलेला लॉकडाऊन थोडा कठोर होता. आम्हाला रस्त्यावर लोक फारच क्वचित दिसून येत होते पण मला वाटते की या वेळेस नागरिक परिस्थिती गांभीर्याने घेत नाहीत. मागील लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयंकर व धोकादायक आहे हे त्यांना समजले पाहिजे. आमच्या समोर रोज शंभराहून अधिक वेळा रुग्णवाहिका जाताना दिसतात. लोकांनी कायद्याचे पालन करून संकटाच्या वेळी घरीच राहिले पाहिजे. आम्ही रोज आमच्या कर्फ्यूमध्ये असे लोक पाहतो जे क्षुल्लक गोष्टींसाठी घराबाहेर पडतात. त्यांना अडवले तर काहीही कारण देतात. लॉकडाऊन असून देखील इतकी लोकं असायची कि प्रत्येकाला थांबवून त्याची शहानिशा करणे हे अशक्य होते.”

“शेवटी आम्ही त्यांना घरी राहण्याचे महत्त्व भावनिकपणे समजावून सांगितले. मी स्वतःच त्यापैकी काहींना घरी राहण्यास, मास्क घालण्यास, माझ्या कुटुंबातील सदस्यांना सांगेन त्याचप्रमाणे सुरक्षिततेचे उपाय करण्यास आणि सुरक्षित राहण्यास सांगितले. नागरिकांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे कारण ते आमच्यासाठी देखील एक कुटुंब आहेत. आमच्या टीमने घेतलेल्या सर्व प्रयत्नांनंतर आज आम्हाला कोणी अनावश्यक कारणांसाठी फिरत असताना दिसून आले नाही. काही आठवड्यांपर्यंत लोकांनी असेच नियमांचे पालन केले तर त्याचा आपल्या सगळ्यांवर चांगला परिणाम होईल. सरकारने लादलेल्या नियमांचे पालन करावे. आपण सर्वजण यातून बाहेर पडू.’ असे API घावटे म्हणाले.
पुणे शहरातील पोलिस विभाग त्यांचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्यासाठी कठोर प्रयत्न करीत आहेत, आता हे प्रयत्न नागरिकांकडून देखील होण्याची गरज आहे.