कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा ! 25 जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला होणार

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा अधिक चर्चेत असलेला नवा पत्री पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. अनेक अडचणीवर मात करीत पूलाचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी बहुदा प्रयत्न केले आहे. शेवटी हे काम पूर्णत्वास आले आहे. या पूलाचे लोकार्पण २५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूलाचे ऑनलाईन लोकार्पण करून, हा पूल खुला करण्यात येणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या ऑनलाईन सोहळ्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.

जुना पत्रीपूल हा ब्रिटीशकालीन होता. हा पूर्वीचा पूल वाहतूक करण्यासाठी धोकादायक असल्याचे रेल्वेने केलेल्या एका ऑडीटमध्ये समोर आले आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर मोठी यंत्रणा लावून नोव्हेंबर २०१८ मध्ये पूलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर या पूलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्याने अडचण निर्माण झाली होती. हैद्राबाद येथील कारखान्यात तयार केलेला गर्डर हा या अनेक वर्ष जुन्या पत्री पूलच्या जागेवर नवा ७०० किलो टन वजनाचा आणला आहे. कोरोना काळात हा गर्डर आणण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे.

या पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते. आत्ता विरोधकांकडे पत्री पूलाचा मुद्दा नाही. विशेष म्हणजे कल्याण ठाकूर्ली समांतर रस्त्याचा अप्रोच रोडही अपुरा होता. मात्र २८ नोव्हेंबरपासून या रस्त्याचे काम महापालिकेने युद्ध पातळीवर हाती घेतले. अप्रोच रोडचे काही पूर्णत्वास आले आहे. हा पूल वाहतूकीसाठी खुला केल्यावर पूलाच्या दिरंगामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेला पूल आणि असे दोन्ही पूल मिळून कल्याण शीळ रस्त्याच्या चार लेन पूर्ण करीत आहे. मात्र भिवंडी- कल्याण- शीळ हा रस्ता सहा पदरी असून त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तिसऱ्या लेनकरीता नव्या पत्री पूलाच्या बाजूला आणखीन एक तिसरा रेल्वे उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे काम लवकर सुरु करण्यात येणार आहे.