चेहरा आणि केसांच्या सौंदर्यासाठी संजीवनी ठरतो ‘ग्रीन टी’ ! जाणून घ्या कसं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांनी चहा आणि कॉफीसाठी आरोग्यदायी पर्याय म्हणून ग्रीन टीचा पर्याय स्विकारला आहे. ग्रीन टी जेवणानंतर जर घेतला तर आपण खाल्लेलं अन्न पचन होण्यास चांगली मदत होते. ग्रीन टी हा पिण्यासोबतच सौंदर्यवर्धक उपचारांसाठी देखील फायदेशीर आहे. नितळ त्वचा आणि निरोगी केसांसाठीचा सर्वात नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग म्हणून ग्रीन टीकडं पाहिलं जातं. यासाठी काही ट्रीक्स आपण जाणून घेणार आहोत. इतकंच नाही तर ग्रीन टी चेहऱ्यासाठी कसा फायदेशीर आहे याचीही माहिती आपण घेणार आहोत.

घरच्या घरीच करा ग्रीन टी ट्रीटमेंट
आपण घरच्या घरीच ग्रीन टी ट्रीटमेंट करू शकतो. जेव्हा तुम्ही शॅम्पूनं केस धुता तेव्हा कंडिशनिंग म्हणून तुम्ही ग्रीन टीचं पाणी केसांना लावू शकता. केसांच्या फॉलिकल्ससाठी हे पाणी नवसंजीवनी ठरतं. यामुळं केसांना पोषण मिळतं आणि वाढीसाठी चालना देखील मिळते. याचा केसांना खूप फायदा होतो.

चमकदार केसांसाठी असा करा ग्रीन टीचा वापर
सेलिब्रिटींसारखे चमकदार आणि मऊसुत केस हवे असतील तर ग्रीन टीच्या पानांमध्ये एक अंड फोडावं आणि दही घालून ते चांगलं एकजीव करावं. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावं आणि ते अर्धा तास लावून ठेवावं. नतंर कोमट पाण्यानं केस धुवावेत.

चेहऱ्यासाठी ग्रीन टी फायदेशीर
जर तुम्ही मुरुमांच्या डागानं वैतागला असाल तर एक घरगुती उपाय करून बघा. ग्रीन टीच्या काही टी बॅग्ज गरम पाण्यात घाला. पाणी गाळून थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर प्रत्येक वेळी चेहरा धुण्यासाठी साध्या पाण्याऐवजी त्वचेला हितकारक असणारं हे द्रावण वापरा. ग्रीन टीनं चेहरा धुतल्यानंतर चेहरा पुसू नका. हे द्रव चेहऱ्यात हळू हळू मुरू द्या. हा क्रम जर सातत्यानं पाळला तर चेहऱ्यावरचे डाग हळूहळू नाहीसे होती आणि मुरूमांनाही प्रतिबंध होईल. त्याचप्रमाणे अचानक मुरूम येणंही बंद होईल. याच्याच जोडीला नंतर तुम्ही मॉईश्चराईजर देखील लावू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.