जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, 15 जखमी

वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला निशाणा बनवत ग्रेनेड फेकले. हल्ल्यात 15 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोपोरमधील हॉटेल प्लाझाच्या जवळ हल्ला झाला आहे. हा हल्ला दुपारी सव्वा चार वाजता झाला असून सीआरपीएफचे जवान घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.

खोर्‍यात दहशतवादी ‘सक्रिय’
जम्मू-काश्मीरमध्ये मोठया बंदोबस्तानानंतर देखील दहशतवादी सक्रिय आहेत. दिवाळीपुर्वी म्हणजेच दि. 26 ऑक्टोबर रोजी देखील श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला करून पलायन केले होते. 26 ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या करननगरमधील काकासराय येथील सीआरपीएफच्या जवानांना निशाणा बनवलं होतं.

24 ऑक्टोबरला देखील अशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. दहशतवाद्यांनी कुलबाग येथील सीआरपीएफ कॅम्पवरच ग्रेनेड हल्ला केला होता. त्यामध्ये सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. दरम्यान, 7 ऑक्टोबरला देखील श्रीनगरमध्ये हरि सिंह हाइट स्ट्रीटच्या जवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता आणि त्यामध्ये 7 जण गंभीर जखमी झाले होते.

युरोपियन खासदारांचा जम्मू-काश्मीर दौरा
झालेला ग्रेनेड हल्ला हा 27 युरोपियन खासदारांच्या दौर्‍याच्या एक दिवस अगोदर झाला आहे. दि. 29 ऑक्टोबरला युरोपियन खासदारांचं 27 जणांचं एक शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर येणार आहे. आजच (सोमवार) युरोपियन खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली आहे. यामध्ये काश्मीरबद्दल देखील चर्चा झाली. दरम्यान, युरोपियन खासदारांचा हा दौरा काही ऑफिशियल दौरा नाही.

शिष्टमंडळामध्ये समावेश असणार्‍या बीएन डन यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना कलम 370 बाबतची सर्व माहिती सांगितली. मात्र, युरोपियन खासदारांना नेमकं जम्मू-काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे हे पाहायचं आहे. शिष्टमंडळ हे जम्मू-काश्मीरच्या रहिवाशांची देखील भेट घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपेक्षा आहे की, शिष्टमंडळास परिसरात होणार्‍या विकासाची देखील माहिती मिळेल.