Lockdown : गरजवंतांच्या मदतीसाठी रजनीकांतचा ‘दरबार’ खुला, हजारोंना पुरवणार किराणा माल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाच्या लढ्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून अभिनेत्यांपर्यंत मदतीचा हात दिला जात आहे. लॉकडाउन काळात रोजंदारीवर काम करणार्‍या मजूरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिक गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडिया’ला 50 लाख रुपयांची मदत केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी आता 1 हजार गरजू कलाकारांना किराणा माल पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाउनमुळे कलाविश्वातील पूर्ण कामकाज बंद झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणार्‍या अनेक ज्युनिअर आर्टिस्ट, रोजंदारीवर काम करणारे मजूर यांना आर्थिक आणि दैनंदिन समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रजनीकांत यांनी साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन (नदीगर संगम) अंतर्गंत येणार्‍या 1 हजार कलाकारांना किराणा सामान पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनंदिन जीवनात लागणार्‍या जवळपास सगळ्या वस्तूंचा समावेश त्यामध्ये करण्यात आला आहे. भाज्या, तांदूळ, दूध या सारख्या वस्तूंचा त्यात समावेश असणार आहे. लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून कलाविश्वातील अनेक कलाकार एकत्र येऊन अशा गरजूंना मदत करत आहेत. आतापर्यंत दाक्षिणात्य कलाविश्वातील चिरंजीवी, महेशबाबू यासारख्या अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.