वरातीमध्ये DJ च्या तालावर पत्नीसह केला ‘डिस्को’ डान्स, तेथील अंगणातूनच निघाली नवरदेवाची ‘अंत्ययात्रा’

निजामाबाद : वृत्तसंस्था – तेलंगणामध्ये निजामाबाद येथे लग्नाच्या १२ तासाच्या आतच नवरदेवाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून लग्नात नवरदेवाने डान्सपण केला होता. पण नंतर असा प्रकार घडल्यामुळे सगळे वातावरण शांत झाले.

निजामाबाद येथील बोधन या शहरातील ही घटना असून गणेश नावाच्या २५ वर्षीय तरुणाचे लग्न होते. दरम्यान लग्नासाठी रात्री गावात वरात काढण्यात आली असताना गणेशने आणि त्याच्या पत्नीने चांगला डान्सही केला. पण लग्नाच्या वरातीत इतक्या उत्साहाने नाचल्याने गणेशला हृदयविकाराचा झटका आला. त्यांनतर त्याच्या कुटुंबाने तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टराकडून मिळाली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गणेशचा मृत्यू हृदयविकाराने झाला असून आपल्या पत्नीसोबत नाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला.

गणेशला डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्रास व्हायला लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. गणेश हा आखाती देशातील एका कंपनीत काम करत होता, अशी माहिती मिळत आहे. सात दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. या घटनेची तक्रार पुलिस स्टेशन मधे दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत. गणेशच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.