‘सुसाईड’ नोटमध्ये ‘भावना’ व्यक्त करून हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाची आत्महत्या 

नाशिक :  पोलीसनामा ऑनलाईन – घरात सर्वत्र लग्नाची धामधूम… आता निखिलला हळद लागणार म्हणून हळदीची जय्यत तयारी देशमुख यांच्या परिवारात चालू होती. मात्र हळदी समारंभाच्या पूर्वसंध्येलाच नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशकातल्या सातपूर परिसरात ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, निखिल देशमुख या तरुणाचा आज (शनिवारी) नाशिक शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणीशी होणार होता. नाशिक येथील हिरावाडी परिसरात देशमुख कुटुंब राहते. सातपूर परिसरातील एका कंपनीमध्ये तो काम करीत होता. कंपनीजवळ बळवंतनगरमधील एका फ्लॅटमध्ये निखिल राहत होता. गुरुवारी एकीकडे घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु असताना कंपनीजवळ असलेल्या फ्लॅटवर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं.

मी आयुष्यात काहीही करु शकलो नाही…

पोलिसांना निखिलच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत असे लिहिले होते की, ” मी आयुष्यात काहीही करु शकलो नाही, म्हणून मी जीवन संपवत आहे”  त्याने लिहिलेल्या या चिठ्ठीवरून तो तणावात होता असे निदर्शनास येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. निखिलने अचानक टोकाचे पाऊल उचलल्यामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.