…अन् नवरदेव ट्रॅक्टरवर बसून पोहाेचला लग्न मंडपात; शेतकर्‍यांच्या आंदोलनाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा

कर्नाल : पोलीसनामा ऑनलाइन –   नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणा-या शेतक-यांना देशभरातून विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. माजी खेळाडूंनी पद्म पुरस्कार परत करण्याचा इशारा देत पाठिंबा दिला आहे, तर सेलिब्रिटींनीही ट्विट करून पाठिंबा व्यक्त केला आहे. हरियाणाच्या कर्नाल येथील एका नवरदेवाने अनोख्या पद्धतीने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नवरदेव थेट ट्रॅक्टरवर बसून लग्न मंडपात पोहोचला. या कृतीतून आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत असल्याचे त्याने सांगितले.

हा नवरदेव लग्न मंडपात पोहोचण्यासाठी नवरदेव आलिशान कारमधून निघाला होता. पण वाटेत एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पाहून त्याने कारमधून बाहेर पडून ट्रॅक्टरवरून लग्न मंडपात पोहोचण्याचा निर्णय घेतला. आपण शहरात राहत असलो तरी शेती हे आपले मूळ आहे. शेतकरी हीच आपली प्राथमिकता असायला हवी. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असणाऱ्या शेतकरी बांधवांना जनतेचाही पाठिंबा आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे म्हणून मी ट्रॅक्टरवरून येण्याचा निर्णय घेतल्याचे नवरदेवाने सांगितले.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारकडून सतत चर्चेच्या फैरी झडत असल्या तरी शेतकरी संघटनांनी कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे.