अल्पवयीन वधूचं ‘लग्न’ थांबवलं तर नवऱ्या मुलानं केलं 12 वर्षीय बहिणीचं ‘अपहरण’, जाणून घ्या संपूर्ण घटना

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात शुक्रवारी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न थांबविल्यामुळे नवरदेवाने 12 वर्षीय बहिणीचे अपहरण केले. नंतर पोलिसांना अल्पवयीन मुलीला शोधण्यात यश आले, परंतु नवरा मुलगा फरार झाला आहे. ही घटना अशी आहे की मुरैना जिल्ह्यातील पोरसा तहसीलमधील गाव पद्दूपुरामध्ये राहणाऱ्या रामप्रकाश सखबार यांच्या 14 वर्षे सात महिन्यांच्या मुलीचे लग्न श्योपुर जिल्ह्यातील विजयपूर येथे राहणारे विनोद सखबार बरोबर ठरले होते. गुरुवारी रात्री सतीशच्या घरी वरात आली. या दरम्यान, कुणीतरी अल्पवयीन मुलीच्या लग्नाची माहिती प्रशासनाला दिली. तातडीने मुरैना येथील महिला व बालविकास विभाग आणि चाईल्ड लाईनची टीम पोरसा ठाण्यातील पोलिसांसह गावात पोहोचली आणि लग्न थांबवले.

वराने वधूच्या मावस बहिणीसह मिळून रचला कट

पोलिसांच्या टीमने अल्पवयीन वधूला वन स्टॉप सेंटरमध्ये नेले आहे, तर पालकांना त्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी मुरैना येथे नेण्यात आले आहे. अचानक लग्न थांबविण्याला वराने आपला अपमान समजला. कारण हे लग्न वधूची नात्याने मावस बहीण असणारी गुणियापुरा गावातील रहिवासी शकुंतला सखबारने जमवले होते, त्यामुळे वराने शकुंतलासोबत मिळून वधूच्या 12 वर्षीय लहान बहिणीचे अपहरण केले. नवरदेव विनोद आणि शकुंतला यांची योजना होती की वधूला पोलिसांनी नेले आहे त्यामुळे आता ते वराचे लग्न वधूच्या लहान बहिणीशी करून देतील.

आरोपी नवरदेव झाला फरार

अपहरणाची माहिती मिळताच पोरसा पोलिस ठाण्यात नवरदेव विनोद व शकुंतला सखबारवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू करण्यात आला. सुमारे पाच तासांत पोलिसांनी पोरसा येथील एका घरातून 12 वर्षाच्या अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला आणि आरोपी शकुंतलास शाधून काढले, तर आरोपी नवरा मुलगा फरार झाला आहे.

नवरा मुलगा आणि नातेवाईकांविरोधात एफआयआर दाखल

पद्दूपुरा येथे अल्पवयीन मुलीचे लग्न थांबवून वधू व तिच्या पालकांना समुपदेशनासाठी आणले होते. या दरम्यान विनोद आणि शकुंतला सखबारने अल्पवयीन वधूच्या 12 वर्षीय लहान बहिणीचे अपहरण केले. तिला शोधण्यात यश आले आहे. नवरा मुलगा आणि शकुंतला यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.