‘Ex गर्लफ्रेंड’च्या समोरच नवरदेवाची कार बिघडली, इच्छा नसतानाही करावं लागलं ‘लग्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाला विसरून एक व्यक्ती दुसर्‍या मुलीशी लग्न करण्यासाठी जात होता, परंतु नशिबात काही वेगळेच होते. फुलांनी सजवलेली कार नेमकी प्रेयसी राहत असलेल्या भागातच बिघडली आणि त्याचवेळेस समोरून स्कूटीवरून प्रेयसी देखील आली. त्यानंतर दोघांमध्ये भर रस्त्यावर जोरदार मारहाण झाली आणि प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. परिणामी दोघांना काही तासांनी लग्न करावे लागले.

पंजाबमधील मोगा गावात राहणाऱ्या जगसीर सिंहचे त्याच गावात राहणारी महिला जसप्रीत कौर हिच्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या महिलेचे दोन लग्न झाले होते व तिला एक मुलगी देखील होती. हे अवैध संबंध ठेवून जगसीर सिंग दुसरे लग्न करण्यासाठी जात होता. बुधवारी नवरदेवाच्या पोशाखात जगसीर सिंह सेहरा परिधान करून कोटकपुरा येथील एका मुलीशी लग्न करण्यासाठी जात होता परंतु त्याची प्रेयसी जिथे काम करत असे तेथेच त्याची गाडी बिगडली.

कार बिघडल्यामुळे नवरदेवास गाडीतून बाहेर पडावे लागले. दरम्यान, त्याची प्रेयसीही आपले काम संपवून परत येत होती आणि तिची नजर नवरदेव बनलेल्या प्रियकराकडे गेली. ती रागाने संतप्त झाली आणि कारला लावलेली फुले काढून फेकू लागली. जेव्हा दोघांच्या भांडणाने मारामारीचे रूप घेतले, तेव्हा हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

पोलिस स्टेशनमध्ये दोन तासाच्या चर्चेनंतर नवरदेव आपल्या प्रेयसीशीच लग्न करेल असा निर्णय घेण्यात आला. पोलिस ठाण्यात या दोघांनी लेखी दिली आणि घरी जाऊन लग्न केले. नवरदेव जगसीर सिंह हा लुधियाना बायपासजवळ बांधण्यात आलेल्या फ्लॅट्समध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तर जसप्रीत कौर ही मोगा-लुधियाना रस्त्यावरील आयकॉन हाइट्स आरके सिटीमध्ये लोकांच्या घरात काम करते.

यापूर्वी जसप्रीतचे 2 वेळा लग्न झाले होते. पहिल्या नवऱ्याने लग्नाच्या 6 महिन्यांनंतर एका प्रवासी महिलेला पळवून नेले. तर दुसरे लग्न मोगा येथील सूरज नगर मध्ये झाले. तो ही एका वर्षानंतर एका डान्सरला घेऊन पळून गेला. त्याच्यापासून महिलेस एक मुलगीही आहे. सध्या दोघेही गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि घरातील सदस्यांनीही लग्नाला मान्यता दिली होती.