अजब प्रथा ! ‘या’ भागात नवरदेवाची ‘बहीण’ करते नवरीशी ‘लग्न’

अहमदाबाद : वृत्तसंस्था – भारताच्या विविध भागांमध्ये लग्न वेगवेगळ्या रीती-रिवाजांना अनुसरून लावले जाते. मात्र असे जरी असले तरी थोड्याफार फरकाने या लग्नाच्या प्रथा या जवळपास सारख्याच असतात. मात्र गुजरात मधील सुरखेडा, सानाडा आणि अंबल गावातील आदिवासींची लग्नाची प्रथा याला अपवाद आहे. त्यांच्यामध्ये चक्क नवरदेव नाही तर त्याची बहीण करते नवरीशी लग्न करते. विशेष म्हणजे नवरदेवाला लग्नाच्या दिवशी मंडपात येण्यास बंदी असते आणि नवरदेवाच्या जागी त्याचे सर्व विधी त्याची बहीण पूर्ण करते. तसेच जर कुणी ही प्रथा मोडली तर त्या कुटुंबावर संकट येतात असे या भागात मानले जाते. त्यामुळे ही परंपरा अजूनही चालूच आहे.

गुजरातधील सुरखेडा, सानाडा आणि अंबल या भागातील आदिवासी भागामध्ये लग्नाच्या दिवशी नवरदेवाला लग्नमंडपात येण्यास मनाई असते. नवरदेव लग्नाच्या दिवशी लग्नाचा पोशाख घालून तयार होतो. त्याची रिवाजाप्रमाणे ओवाळणी केली जाते मात्र तो घराबाहेर पडत नाही. त्याच्याऐवजी त्याची बहीण नवरीसारखच मेक -अप करून लग्नमंडपात जाते व लग्नातील सर्व नवरदेवाच्या विधी पूर्ण करते. नवरदेवाची बहीणच नवरीच्या भांगात कुंकू भरते तिच्यासोबत सप्तपदी घेते.

सुरखेडा गावाचे कांजिभाई राठवा यांनी या प्रथेबाबत माहिती देताना सांगितले की, ‘ही प्रथा काटेकोरपणे आजही पाळली जाते. काही जणांनी ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्याच्यावर संकटे आली. काहींचे लग्न टिकले नाही तर काहींच्या घरांवर इतर संकटे आली. त्यामुळे ह्या प्रथेला आता कोणी विरोध करत नाही. ‘