शेतकरी बांधवांना एकत्र करून गटशेतीचे नियोजन करणार : सयाजी काकडे

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात राबणारा शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो. आपल्या मुलाप्रमाणे पोषण करतो; पण याचा मोबदला मात्र त्याला मिळतच नाही, तर तयार झालेल्या मलईवर मध्यस्थी मंडळी ताव मारतात. यावर एकच जालीम उपाय आहे तो म्हणजे गटशेती, हवेली तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी बांधवांना एकत्र करून लवकरच गटशेतीला उभारी देणार असल्याचे हवेली तालुका अ‍ॅग्रो असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी काकडे यांनी सांगितले.

आपला देश कृषी प्रधान आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू माणून शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते. यामागचा उद्देश असा की शेतकरी बांधवांचा जीवनस्तर उंचावला पाहिजे; परंतु असे होताना दिसत नाही. उलट फारच थोड्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतो.

अवकाळी पाऊस दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकरी सोसतो, त्यांच्या समस्यांचा पाढा संपतच नाही याचे खरे कारण म्हणजे पिकवलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. बाजारपेठेतील मागणीचा कल जाणून शेती पीक घेतले तर याचा फायदा होतो. यासाठी शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन गटशेतीचे नियोजन केले पाहिजे; परंतु यात पुढाकार घेऊन आपल्या बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न सयाजी काकडे करणार आहेत. त्यानी सांगितले की, हवेलीच्या पूर्व भागातील शेतकरी सधन असला तरीही शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे दौंड व पुरंदर या तालुक्यांतील शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन गटशेती करावी, यासाठी त्यांनी माझ्याशी संपर्क करावा त्यानंतर एक बैठक घेऊन नियोजन करण्यात येईल.

पुणे शहर जवळ असल्याने तरकारीची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे; परंतु एकाच पिकावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित न करता वेगवेगळ्या मागणीनुसार नियोजनबद्ध शेती करण्यावर भर देऊन अधिक फायदा मिळविता येऊ शकेल, असे काकडे म्हणाले.